Thursday, 23 January 2014

कथा हैदराबादच्या निजामाची

कथा हैदराबादच्या निजामाची 

आजकाल भाजप-कांग्रेस मध्यें चाललेल्या पटेल-नेहरु विवादामुळे हैदराबाद व त्याचा निजाम चर्चेत आहेत. देशाला स्वतंत्र होऊन 66 वर्षे व निजामाला मरुन कित्येक वर्षे झाली आहेत. परंतु आज देखील निजामासंबंधी आकर्षण कमी झालेले नाही. कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन निजाम चर्चेत येतच राहतो. काही वर्षांपूर्वी लंडनच्या वेस्टमिनिस्टर बॅंके मध्यें गोठवलेल्या कित्येक लक्ष रुपयांची संपत्ती व त्यावर दावा करणाऱ्या चारशे पेक्षा जास्त वारसदारांमुळे हा निजाम चर्चेत आला होता. त्यापूर्वी 2002 मध्यें हैदराबादेत रत्नालंकारांच्या प्रदर्शनामुळे तो मीडियात चर्चित झाला होता.

ज्या निजाम मीर उस्मानअली खानवरुन चर्चा चालली आहे तो निजाम असफजाही खानदानाचा असून त्याच्या खानदानाने दख्खनवर सव्वादोनशे वर्षे राज्य केले आहे. शेवटचा निजाम उस्मानअली जे सोडून गेला आहे त्यात अफाट धन-संपत्ती, भव्य महाल, संग्रहणीय रत्नालंकार व बहुमूल्य पैंटिंग्स तर आहेतच त्याशिवाय 2700 पेक्षा जास्त औरस-अनौरस वारसदार देखील आहेत जे या स्थावर मत्तेच्या वाटणी साठी न्यायालयाची दारे ठोठाऊन राहिले आहेत. आणि या सगळ्याला कंटाळून अधिकृत वारस नातू प्रिंस मुकर्रमजाह तुर्कीत दोन रुमच्या फ्लॅट मध्ये राहत आहे. जेव्हां हैदराबाद संस्थान खालसा केले गेले तेव्हां सरकारने निजामाला सन्मानाची वागणूक देत करमुक्त सालाना 50लाख रुपयांचा तनखा मंजूर केला होता. त्या बरोबरच 25लाख जहागिरीच्या उत्पन्नाच्या बदल्यात व 25लाख राजप्रासादाच्या देखरेखीसाठी व 25लाख दोन राजपुत्रांकरिता अशाप्रकारे कुल 75लाख त्यांना मिळते ते वेगळे. 1950-56 ते राजप्रमुख होते.

पण आता निजामाचे 150पेक्षा जास्त नातवंड जे कधी रुबाबात राहत असत आज हैदराबादच्या विभिन्न भागातून विखुरलेले असून गरीबीत निर्वाह करित आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी लाजिरवाणी आहे की त्यांना स्वतःस निजामाचे वंशज म्हणविण्याची देखील लाज वाटते. तुटक्या-फुटक्या घरांमधून राहत असलेल्या या निजामांच्या वंशजांपैकी कांही सायकली दुरुस्त करुन तर काही फळ विकून पोट भरित आहेत.

या उध्वस्त झालेल्या निजामाच्या वंशजांचे पूर्वज जे एकेकाळी आपल्या संपन्नतेकरिता ओळखले जात असत तसेच ते आपल्या कद्रूपणाकरिता पण प्रसिद्ध होते. शेवटचा निजाम उस्मानअली 185 कॅरेटचा जेकब डायमंड पेपरवेट सारखा उपयोगात आणित असे.  उत्तम मोटारींचा ताफा बाळगूनही तो स्वतः मात्र एक खटारा गाडीतून फिरे. चिक्कू तर इतका होता की 'किंग कोठी" पॅलेस मध्यें फाटके व फडतूस कपडे घालून स्वस्त चारमीनार सिगारेटी ओढ़त वावरत असे. आपल्या शेवटच्या काळात स्वतः जवळच्या सोन्याच्या प्रचंड साठ्याला विशेष पेट्यांमध्यें लादून हैदराबादहून मुंबईस नेऊन 150 रुपये तोळ्याला विकले होते व त्यावेळेस निर्देश केला होता की रिकाम्या पेट्या व त्यांचे कुलुप परत आणले जावे.
सन्‌ 2002 मध्यें हैदराबादेत जेव्हां त्याच्या रत्नालंकारेचे प्रदर्शन भरविले गेले होते तेव्हां त्याच्या अफाट दौलतीचे व कंजूषीचे कैक कहाण्या-किस्से यांची रसभरीत वर्णनं वृत्तपत्रातून झळकली की जणू 54 (आजपासून 65) वर्षांपूर्वी मुस्लिम राज्याची दिवास्वप्ने पाहणारा निजाम ही कोणी दुसरीच आसामी होती की काय असा भास व्हावा! ज्यांने पंडित नेहरु व सरदार पटेलांसारख्या श्रेष्ठ राजकीयां वाटाघाटीच्या गुऱ्हाळात वर्षभर गुंगवत ठेवले होते. ज्या लोकांना ऐतिहासिक घटनांच फारस भान नसेल त्यांना तर आश्चर्यच वाटेल की हा निजाम संपूर्ण इस्लामी जगताचा खलिफा होण्यास उत्सुक होता. त्याचा जगभरच्या मुसलमान जनतेवर चांगला प्रभाव होता. ब्रिटिशांनी आपल्याला खलिफा म्हणून मान्यता द्यावी असा त्याचा प्रयत्न होता. ब्रिटिशांनी यास मान्यता दिली नाही. शेवटी भारतीय मुस्लिम नेत्यांनी निजामला भारताचे 'शेख उल इस्लाम" हे पद धारण करण्याची विनंती केली. ब्रिटिशांच्या विरोधामुळे निजामाने हे पद स्वीकारण्यास नाकारले. पण 1933 मध्यें निजामाने आपल्या एका मुलाचे लग्न पदच्युत खलिफाच्या मुलीशी, तर दुसऱ्या मुलाचा विवाह खलिफाच्या नातीशी घडवून आणला.

निजामनी खलिफा पद स्वीकारावेचे प्रयत्न तेव्हां केले गेले होते जेव्हां कमाल अतातुर्कने 1924त खिलाफतच नष्ट करुन टाकली. तत्पश्चात भारतीय मुस्लिम नेते आगाखान, अमीरअली हे कमालपाशांना भेटले व अब्दुल मझिदची खिलाफत कायम ठेवावीची विनंती केली. 
कमालपाशानी ही विनंती फेटाळून लावल्यावर त्यांनी विनंती केली की त्यांनी स्वतः खलिफा व्हावे. कमालपाशानी त्यांना विचारले, 'तुम्ही ब्रिटिशांचे गुलाम नागरिक आहात. मी जगाचा खलिफा झाल्यावर तुम्ही माझ्या आज्ञा पाळणार आहात काय?  जर पाळणार नसाल तर मग मी खलिफा बनून काय अर्थ आहे?" आता इस्लाम व भारतीय मुसलमानांचे काय होईल या चिंतेेने व भीतीने ते बैचेन झाले व लगेच जगात नवी खिलाफत स्थापन करण्याच्या प्रयत्नास भारतीय मुस्लिम नेते लागले. अब्दुल मझिदने नकार दिल्यावर ते इराणच्या शाह रझापहलेवी यांच्याकडे गेले व त्यांनाही हीच विनंती केली. पण शाह यांनी खलिफा होण्यास नकार दिला. तेव्हां भारतातच खिलाफत स्थापन करण्याच्या दृष्टीने ते निजामास भेटले होते.

हा निजाम इतका धूर्त होता की 1947-48 हैदराबादला मुस्लिम संघराज्य बनविण्याकरिता त्याने जे कट केले होते ते उघडकीस आल्यावर सगळ खापर रझाकारांवर फोडून स्वतः मोकळा झाला होता. 26 मार्च 1948त निजामाच्या पंतप्रधानाने जाहिर केले होते की, 'निजाम हे हुतात्मा होण्यास तयार आहेत. निजाम व लक्षावधि मुसलमान हे मरण्यास सिद्ध झाले आहेत." परंतु भारताचे सैन्य 13 सप्टेंबर 48ला हैदराबादला गेले व निजामाच्या जुल्मी शासनाचा अंत झाला.

No comments:

Post a Comment