Saturday, 31 August 2013

मलिका - ए - अफगाणिस्तान ः सुरय्या

मलिका - ए - अफगाणिस्तान ः सुरय्या

20व्या शतकाच्या उत्तरार्धात तालिबानाने देशाला महंमद घोरी व महंमद गझनीच्या काळात पोहोचविले आणि इस्लामच्या नावावर अफगाण महिलांना पिंजऱ्यासारख्या बुरख्या मध्ये कैद केल्यामुळे अफगाणिस्तान चर्चेचा विषय झाला, तर 20व्या शतकाच्या पूर्वार्धात अफगाणिस्तान दोन कारणांनी प्रसिद्धिस आला एक म्हणजे इंग्रजांच्या तावडीतून सुटून स्वातंत्र्य मिळवू शकलेला तो एक देश ठरला व दूसरे कारण म्हणजे अफगाणिस्तानची राणी सुरय्या जिला पाश्चात्य देशांमध्ये मिळालेल्या प्रसिद्धि व कीर्ति मुळे.

अफगाण स्त्रियांना सर्वप्रथम मुक्तिचा मार्ग दाखवला तो अमीर अमानुल्ला व राणी सुरय्याने. अमानुल्लाचे राज्य फक्त दहा वर्षे (1919-29) चालले आणि शेवटी त्याच्या सुधारणेला एवढ़ा विरोध झाला की त्यांना देश सोडून जावे लागले. त्याची प्रतिभा आणि हिंमत लोकोत्तर होती. त्याने अमीरचे पद संपवून स्वतःला बादशाह जाहिर करुन इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध आरंभिले. त्याला दडपू न शकल्यामुळे इंग्रजांना त्याच्याशी संधि करावी लागली. अफगाणिस्तान एक स्वतंत्र राष्ट्राच्या रुपात समोर आला. अमानुल्ला युरोपात शिकलेला असून उदारवादी व आपल्या देशाला रुढ़िंपासून मुक्त करुन इस्लामच्या अंधारातून काढून उन्नत व सभ्य देशांच्या श्रेणीत आणण्याकरिता कृतसंकल्प होता. त्याने युरोप व आशियाच्या प्रमुख देशांबरोबर व्यापारी व मुत्सद्दीपणाचे संबंध जोडले. 1920 मध्येच त्याने नवा क्रिमिनल व सिविल कोड तय्यार केला होता.

1913 साली अमानुल्लाने सुरय्याशी विवाह केला या विवाहपूर्वी त्याने आपल्या पहिल्या पत्नी परिगूलशी फारकत घेतली. सुरय्याचा जन्म 24 नोव्हेंबर 1899 रोजी सिरियात दमास्कस येथे झाला. सुरय्याचे शिक्षण दमास्कस येथेच झाले, तिथे तिने आधुनिक व पाश्चात्य कल्पनांचा अंगीकार केला. सुरय्याचे वडील महमूद तर्झी अफगाण असून एक विचारवंत व प्रसिद्ध नेते होते. अमानुल्लाचे वडील हबीबुल्लानेच त्यांना अफगाणिस्तान बोलावून घेतले. अफगाणिस्तानला आधुनिक बनवण्यात याच महमूद तर्झीचा सिंहाचा वाटा समजला जातो. सुरय्याचे वडील महमूद तर्झी हे बहुपत्नीकत्व परंपरे विरुद्ध होते व अफगाण स्त्रियांचे शिक्षण व रोजगार या विषयी आग्रही होते. सुरय्याही याच विचारसरणीची मूर्तिमंत प्रतीक होती. अमानुल्लानी याच विचारांचा अंगीकारकरुन काबूलव्यतिरिक्त लहान खेड्यापाड्यापासून स्त्री चळवळ सुरु केली. सुरय्याही असे सामाजिक बदल घडवून आणण्याबाबत आग्रही असल्याने अनेक अफगाण मुलींनी उच्चशिणक्षण घेतले, परदेसी जाऊन देखील. पुढ़े जाऊन याच स्त्रियां सरकारी खात्यातून अधिकारी म्हणून कार्यरत झाल्यात.

सुरय्याच्या प्रोत्साहनामुळे अनेक स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या. 1928 मध्ये तुर्कस्तानातील बदल पाहून सुरय्याने 15 होतकरु मुलींना तुर्कस्तानला पाठवले. अफगाणिस्तानात नवी मानसिकता तय्यार करण्याकरिता महमूद तर्झीने 'सिराजुल अखबार" नावचे पत्र सुरु केले होते तर सुरय्या ने स्त्रियांसाठी 'इरशाद-ए-निस्वान" हे मासिक सुरु केले होते. सुरय्या आपल्या भाषणांमधून स्त्रियांदेखील पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र्य मिळाले पाहिजेचा प्रचार करित असे. सुरय्याने देशाच्या उत्क्रांति मध्ये मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळेच अमानुल्ला अफगाण जनतेला उद्देशून मी तुमचा राजा असलो तरी तुमची शिक्षणमंत्री ही तुमची राणी सुरय्याच आहे, असे उद्गार काढ़ित असे. सुरय्या जनतेला शिक्षण व ज्ञान प्राप्ती करिता म्हणीत असे. सुरय्या अमानुल्ला बरोबर अनेक सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत असे. अश्वारोहण व शिकारीचा छंद तिने जोपासला होता. अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात जख्मी सैनिकांशी ती भेटत असे. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना भेटवस्तू देत, बंडाळीच्या स्थानी जाऊन लोकांशी चर्चा करित असे.

अमानुल्लाच्या आधुनिकीकरणाचा व समाज सुधारणांचा प्रचंड विरोध झाला. इस्लामच्या नावाने चालणाऱ्या ढ़ोंगाला त्याने शीर्षासन करावयास लावले. बुरखा प्रथेवर बंदी आणली. अफगाण स्त्रियां पाश्चात्या पद्धतीचा पोशाख करु लागल्या, केस कापू लागल्या. पुरुषांदेखील कोट-पॅंट घालणे अनिवार्य केले. बालविवाहवर बंदी आणली. शुक्रवारच्या जागी गुरुवारी सुट्टी जाहिर केली गेली. देवबंदी  उलेमांना देशातून हाकलून टाकले.

1928-29 मध्ये अमानुल्ला व सुरय्या यांनी युरोपला भेट दिली. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने त्यांना सम्मानीय पदवी दिली. सुरय्याने तेथील विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान दिले. अमानुल्ला पाश्चात्य तंत्रज्ञानाने फार प्रभावित होता. त्यानेच सगळ्यात आधी फोटोग्राफीची साधने अफगाणिस्तानात आणलीत. त्या दोघांची जीवनप्रणाली पाश्चात्य पद्धतीची असून त्यांच्या दिनचर्येत शूटिंग, हंटिंग व फिशिंगचा समावेश होता. सुरय्या नेहमी चायपानाचा कार्यक्रम करत. इंग्लंडच्या उच्चभ्रू महिलांप्रमाणे पोशाख करणारी अशी प्रतिमा सुरय्याची होती. अशा प्रकारच्या दिनचर्येशी अफगाण लोक अनभिज्ञ होते. 10 डिसेंबर 1927त अमानुल्ला व सुरय्या भारतात चमन येथे आले होते. चमनहून ते कराचीला गेले येथे एका समारंभात सुरय्यास अनेक महिला भेटल्या. त्यावेळेस सुरय्यानी सांगितलेल्या कथा व तिच्या सौंदर्याचे वर्णने त्यावेळी लोकांत चर्चिली गेली.

1919 मध्ये इंग्रजांशी युद्ध केल्याने अमानुल्ला व इंग्रजांचे संबंध चांगले नव्हते. त्याने अफगाणिस्तानाची घटना तैयार केली होती. सरकारचे स्वरुप व राजाची भूमिका या सगळ्या गोष्टी जनतेच्या समोर स्पष्ट केल्या. जगात अमानुल्ला व सुरय्या ने केलेल्या सुधारणा  चर्चेचा विषय झाले. किंतु, इंग्रजांनी सुरय्याच्या स्त्री मुक्तीच्या आंदोलनाचा विरोध केला, अफगाणिस्तानाला आधुनिक बनविण्याच्या उपक्रम कट्टरपंथियांना पसंत नाही पडला. 1929 मध्ये जेव्हा ते परतले तो पर्यंत त्यांच्या विरोधात जोरदार मत अफगाणिस्तानात तयार झाले होते. त्यामुळे अंतर्गत यादवी टाळण्यासाठी अमानुल्ला व सुरय्या यांनी देश सोडण्याचे ठरवले व उर्वरित आयुष्य परदेशात व्यतीत केले. अफगाणिस्तान परत मागे गेला. तुर्कस्तान तर कमाल अता तुर्क सुधारणा करण्यात यशस्वी ठरला पण अफगाणिस्तानात मात्र अमानुल्ला अपयशी ठरला. परंतु, अमानुल्ला व सुरय्याने रोपलेले बी पुन्हा प्रस्फुटित झाले.


  1977 मध्ये काही पुरोगामी विचारांच्या महिला एकत्र आल्या आणि त्यांनी 'रिव्होल्यूशनरी अफगाण विमेन्स असोसिएशन" (रावा) या संस्थेची स्थापना केली. सामाजिक न्याय आणि मानवी अधिकारांचे जतन हे 'रावा"चे ध्येय आहे. 'रावा" मुस्लिम कट्टरपंथियांच्या विरोधात तर आहेच, परंतु 1979 साली अफगाणिस्तानात झालेल्या रशियन आक्रमणालाही 'रावा"ने विरोध केला होता. जेव्हा तालिबानाने सत्तेत आल्या नंतर अफगाण स्त्रियांचे जगणे पूर्णपणे अंधकारमय करुन टाकले होते तेव्हा अशा भयानक परिस्थितित देखील काही अफगाण महिला फार मोठा धोखा पत्करुनही मुलींसाठी गुप्त शाळा चालवित होत्या. 'रावा"ने भूमिगत कार्य चालूच ठेवले. अशक्य झाले तेव्हा 'रावा"ला अफगाणिस्तान सोडून पाकिस्तानला जावे लागले. तिथेही त्यांनी निर्वासित अफगाण स्त्रिया-मुलींसाठी, छोट्या मुलांसाठी शाळा चालवल्या. उपजीवेकेच साधन म्हणून शिवणकाम, विणकामचे शिक्षण दिले. महिलांसाठी दवाखाने चालवले. यूनो जगभरची सरकारे यांच्यापुढ़े अफगाण स्त्रियांची दुर्दशा मांडली. त्यांच्याकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदतीची अपेक्षा ठेवली. परंतु, त्यावेळी जगाने अफगाण स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांकडे दुर्लक्षच केले. अकरा सप्टेंबर रोजी अमेरिकेवलर दहशतवाद्यांनी हल्ले केले, तेव्हा कुठे अमेरिकेला आणि पाठोपाठ जगाला जाग आली. तो पर्यंत अफगाण स्त्रियांनी हिंमतीने, धैर्याने, अनंत अन्याय-अत्याचार सोसूनही कुटुंबाचा कणा ही आपली भूमिका पार पाडली.

No comments:

Post a Comment