Wednesday, 7 December 2011

ईश्वराचे अधिष्ठान आणि सावरकर

 ईश्वराचे अधिष्ठान आणि सावरकर
कणाद shirishsapre.com

सावरकर नाव उच्चारले की आमच्या डोळ्यांसमोर जे चित्र उभे ठाकते ते समुद्रात उडी टाकणाऱ्या वीराचे, स्वातंत्र्य संग्रामातल्या एका अप्रतिम योद्धाचे  ज्यांस आम्ही अत्यंत आदराने स्वातंत्र्यवीर म्हणतो, हिंदु-हिंदुत्वाचे दर्शन मांडणाऱ्याचे ज्याच्या मुळे सर्वांचेच डोळे दीपले. पण सावरकर म्हणजे केवळ इतकेच नाही तर सावरकरांची जी विविध रुपे आहेत त्यांचा तो एक भाग मात्रच आहे. ही विविध रुपे वर्तमानकाळात एक प्रकारे विस्मृतीच्या कपारीत दडल्या सारखी झाली आहेत. असेच एक रुप आहे विज्ञाननिष्ठ सावरकरांचे.

सावरकरांचे हे रुप सर्वसाधारणजनांच्या विचारांना हादरवून सोडते. हे जितके खरे आहे तितकेच हे पण खरे आहे की सावरकर एक वास्तववादी क्रांतीकारी, प्रगतीशील विचारांचे धनी होते. त्यांचे विचार काळ बदलला तरी टिकून राहणारे, काळबाह्य न होणारे अर्थात्‌ सर्वकाळिक आहेत. यातहि दुमत नाही. त्यांचे संपूर्ण जीवन या राष्ट्राकरीता, हा हिंदु समाज आधुनिक, विज्ञाननिष्ठ संघटित व्हावा, हेच ध्येय समोर ठेऊन याच ध्येयपूर्ती करीता वाहिलेले होते. आपल्या हिंदु समाजाचे अभ्युदय आणि निःश्रेयस दोन्हीं साधले गेले तरच तर समाज आणि राष्ट्राची उन्नती साधली जाईल. हीच परिकल्पना त्यांनी आपल्या हिंदुध्वजातहि साकारली आहे. त्यांनी जी समाजक्रांती केली त्यामुळे अनेक रुढ़ींना धक्का पोहोचला आणि समाजात सर्वात जास्त लोक अप्रियहि तेच झालेत. हे दुर्दैव. पण ज्या गोष्टी समाजाला घातक त्यांच्या बद्दल धाडसाने विरोध म्हणजे क्रांती आणि अशी क्रांती करणारा आपल्या भाग्यात यश येईल की अपयश यांची किंचितहि पर्वा करीत नाही.

सावरकर असा सूर्य आहे की त्यांच्या बद्दल कितीहि दुष्प्रचार केला गेला किंवा न उल्लेखाने मारण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न केला गेला तरी आपल्या तेजाने ते सर्वांस निष्प्रभ करुन टाकतात.

एक दुष्प्रचार त्यांच्या बाबतीत हेतुपूर्वक असा केला जातो की बघा इतका तेजस्वी, तपस्वी कल्पनेपलीकडच्या यातना भोगून देशाच्या स्वातंत्र्यतेकरीता लडणारा योद्धा पण त्यांस यश नाही मिळाले. कां? कां की त्यांस ईश्वराचे अधिष्ठान नव्हते. आता या दुष्प्रचारकांना ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय? हेच समजत नसावे असे म्हणावयासे वाटते. तसेहि ईश्वराचे अधिष्ठान कोणी लुंग्या-सुंग्यांनी म्हटण्यात अर्थ नाही. असा एकहि सत्पुुरुष ज्याला ईश्वराचे अधिष्ठान प्राप्त झाले होते त्याने असे विचार व्यक्त केलेले नाही. ज्या लोकांनी अंधश्रद्धा पसरवली आणि बुवाबाजी वाढ़वली त्यांना सावरकर जाचकच राहणार आणि मग ती लोक अशीच भाष्य करणार. ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय? हे सावरकरांनी आपल्या विज्ञाननिष्ठ निबंधात विशदले आहे.

सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील त्याचे। परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे।।
समर्थ रामदासस्वामींची ही ओवीं विजेची एक ज्योत आहे! शिवकालीन महाराष्ट्राच्या प्रचंड कर्तृत्वशक्तीची नी हिंदु स्वातंत्र्य समराची केवळ रणघोषणा!

परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, त्या शब्दांनी समर्थांच्या मनात कोणचा अर्थ व्यक्तविण्याचे उद्दिष्ट होते ते आता नक्की सांगणे यद्यपि दुर्घट आहे, तथापि त्यांचा अर्थ काहीहि असला तरी त्या ओवींचे तेजस्वी कार्य ती करुन गेली! तथापि त्या ओवींचा आज केला जाणारा अर्थ आजच्या परिस्थितीत किती अनर्थकारक आहे नी तिच्यांत जे तत्त्व अनुस्यूत केलेले आहे म्हणून साधारणतः समजले जाते, ते ऐतिहासिकदृष्टया किती अतथ्य आहे हे सावरकरांनी दाखवून दिले आहे.
चळवळीचे म्हणजे मानवी प्रयत्नांचे सामर्थ्य किती जरी वाढ़विले तरी ज्या चळवळीला भगवंताचा पाठिंबा नाही ती चळवळ अयशस्वी झालीच पाहिजे. ह्या तत्त्वाचा अर्थ नक्की करताना भगवंताचा पाठिंबा म्हणजे काय, ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय ह्याचा प्रथम स्पष्ट उलगडा झाला पाहिजे. जर भगवंताच्या अधिष्ठानाचा इतकाच अर्थ असेल की ऐहिक आणि मानवी उपायांच्या हातीच यशाची किल्ली नसून मनुष्याच्या ज्ञानाच्या नी शक्तीच्या पलीकडे ज्या अनेक अज्ञात, अज्ञेय, प्रचंड अशा अमानुष विश्वशक्ती आहेत, त्यांच्या आघात-प्रत्याघातांच्या टकरीतहि त्या यशाचा वा अपयशाचा संभव असतो, तर तो अर्थ बरोबरच आहे! ह्या तात्त्विक अर्थी कोणच्याहि चळवळीचे यशापयश हेहि एक फलितच असल्यामुळे मानवी उपायांच्या पलीकडील त्या अमानुष शक्तींचा व्यापार हेच त्यांचे महाकारण होय. त्यास जर ईश्वराचे अधिष्ठान म्हणावयाचे असेल तर मानवी उपाय नी साधनें ही प्रत्यक्ष कारणेच कोणत्याहि यशाची अशेष कारणे नसून ती अमानुष विश्वशक्तींची गुंतागुंत, तो योगायोग, हे त्यांचे महत्कारणहि अनुकूल असले पाहिजे हे म्हटणे यथार्थ आहे. मानवी चळवळ कितीहि सामर्थ्यसंपन्न असली आणि ती कितीहि यशस्वी झाली तरी त्या यशाचे सर्वयश मनुष्यकृत प्रयत्नांसच नसून अतिमानुष शक्तींचा व्यापारहि त्यास अनुकूल असा घडत गेला; दैवाचा फांसाहि तेच दान देणारा पडत गेला; आणि त्या दैवास देवाची इच्छा म्हटले तर ईश्वराचे अधिष्ठान त्यास लाभले म्हणून ते यश आहे हे जर कां त्या ओवींचा उपदेश असेल तर तो यथातथ्य आहे. यात शंका नाही.

परंतु ह्या ओवींचा अर्थ अशा तात्त्विक अर्थी क्वचितच कोणी घेत असेल! सामान्यतः तिचा अर्थ असाच घेण्यात येतो की ज्याला ज्याच्या-त्याच्यापरी नीती वा अनीती, न्याय-अन्याय, दैवी वा आसुरीसंपन्न धर्म वा अधर्म म्हटतो त्यांपैकी पहिले ते सत्य नी दुसरे ते असत्य. जी चळवळ मानवी सत्याच्या पायावर उभी असते; मानवी धर्माचे ब्रीद मिरविते; तीच काय ती यशस्वी होते! ईश्वर तीच्यावरच कृपा करतो अशा अर्थी ईश्वराचे अधिष्ठान जिला लाभत नाही. ती चळवळ कितीहि प्रबळ असली तरी ती यशस्वी होत नाही. यास्तव चळवळ करणाऱ्यांनी प्रथम ते भगवंताचे अधिष्ठान संपादिले पाहिजे आणि हे संपादिण्याकरीता नामजप, उपास-तापास, एकशे आठ सत्यनारायण, एककोटी रामनामजप, रेडे वा बोकड मारणारे नवस इत्यादि शतावधि उपाय देवास संतोषविण्यास्तव वर्णिले आहेत, त्यांस आचरले पाहिजे अर्थात्‌ तपस्या आधी मग मानवी चळवळ.

सावरकरांनी पारलौकिक मोक्ष प्रभृति जी फळे आहेत त्यांचा ऊह केलेला नाही. त्यांची फळे प्रत्यक्ष अनुभवांत केव्हांहि मिळालेली नाहीत ती त्यांची फळे नव्हत इतकेच इथे विषदावयाचे आहे. त्या साधनांविषयी किंवा त्यांच्या आध्यात्मिक वा पारलौकिक परिणामांविषयी ज्यांस जसा आदर नी निष्ठा असेल त्यांस त्यानी सुखनैव आचरावे. त्यापासून लाभणाऱ्या आत्मप्रसादास सुखनैव आस्वादावे. परंतु तशा अर्थाच्या ईश्वरी अधिष्ठानावर वरील ओळीत ज्या राष्ट्रीय उत्थानादिक भौतिक चळवळींच्या ऐहिक यशाचा उल्लेख केलेला आहे, ते यश वा अपयश बहुधा मुळीच अवलंबून नसते; तर मुख्यतः तिच्या भौतिक सामर्थ्यावर अधिष्ठित असते.

वरील ओळीवर हे भाष्य नेहमीच करण्यात येते की हिंदुपदपादशाहीचे जे प्रचंड स्वातंत्र्ययुद्ध आम्हां हिंदुंनी ठाणले नी जिंकले, ती प्रचंड राष्ट्रव्यापी चळवळ यशस्वी होण्याचे मुख्य कारण तिच्या मुळाशी असलेले ईश्वरी अधिष्ठान हेच होय. नाना साधुसंत हरिनामाचा जो अखंड घोष महाराष्ट्रात दुमदुमवीत राहिले, ज्ञानेश्वरसारख्यांनी यौगिक सिद्धी संपादिल्या, सहस्त्रावधि पुण्यपुरुष ईश्वरी कृपा संपादिण्यास्तव जी तपस्याकरीत होते. ती मुळे भगवंत प्रसन्न झाले, ईश्वरी अधिष्ठान मिळाले यास्तव ती चळवळ समर्थ आणि यशस्वी ठरली. हिंदुवीरांना जो जय मिळाला, त्या झुंजीचा पुरावा ज्या अर्थी ईश्वरी अधिष्ठानाच्या सिद्धांतास दिला जातो तो किती लंगडा आहे हे इतिहासाची छाननी करुन सावरकरांनी खालीलप्रमाणे दाखवून दिला आहे.

साधारणतः 1300 ते 1600 पर्यंतचा काळास महाराष्ट्राच्या, भारताच्या इतिहासाचे कां म्हणाना, एक पान कल्पिले तर त्यांत ह्या ईश्वरी अधिष्ठानाच्या दृष्टीकोणातून प्रथमदर्शनीच ज्ञानेश्वरांसारख्या महायोग्याचे दर्शन घडते. जर कधी तपस्येने, योगाने, पुण्याईने कोणा मनुष्यात भगवंताचे अधिष्ठान सुव्यक्त झाले असेल तर ते ह्या अलौकिक पुरुषातच होतेच होते. रेड्याकडून त्यांनी वेद म्हणविले; भींतीना चालविले; हरिनामाच्या गजराने महाराष्ट्र दणाणून सोडले. जिकडे-तिकडे दैवी चमत्कार त्यांच्या मागोमाग नामदेव, जनाबाई, गोरा कुंभार इत्यादि सारे जीवन्मुक्त, साऱ्यास प्रत्यक्ष पांडुरंग प्रसन्नपणे भेटीगांठी देता आहेत, घेता आहेत. त्यांच्या मागोमाग एकनाथ ते तुकाराम ब्राह्मणवाड्यापासून महारवाड्यापर्यंत महाराष्ट्रात घरोघर साधुसंत, घरोघर यौगिक सिद्धि, घरोघर देवाचे येणे-जाणे, प्रत्यही सकाळी कोण्यातरी अलौकिक चमत्काराची ताजी बातमी! अशा चमत्कारांचे वर्णन सावरकरांनी विस्ताराने केले आहे पण विस्तारभयास्तव आम्ही उद. करीत नाही. पुढ़े सावरकर म्हणतात असे वाटते की महाराष्ट्र हेच देवाचे राहते घर झाले होते, वैकुंठ नव्हते!

ईश्वरी अधिष्ठान प्राप्त अशी ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णअक्षरांनी लिहलेली बाजू वाचल्यानंतर जेव्हां आपण दुसरी बाजू उलटतो तर आपल्याला दिसले पाहिजे ईश्वरी अधिष्ठानामुळे भौतिक सामर्थ्य, राष्ट्राची अजिंक्यता. पण दिसते मात्र देवांची नव्हे तर राक्षसांची भौतिक विजय. स्वातंत्र्य आणि राज्य धुळीस मिळून त्या देवाच्या अधिष्ठानावर राक्षसी राज्याची उभारणी.

काय हा दुष्ट योगायोग! परमयोगी ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी" लिहून आपली लेखणी खाली ठेवली न ठेवली, तोच अलाउद्दिन खिलजी दहा-पंधरा हजार सैन्यास घेऊन बकऱ्यांच्या कळपात वाघ घुसावा तसा घुसला नी ज्ञानेश्वरांच्या भगवंताचा पूर्ण पाठिंबा असलेल्या रामदेवास अलाउद्दिन विंध्याद्रि उतरून आल्याची बातमी देखील पुरती कळाली नाही नी रामदेवरावाच्या हरिभक्त हिंदुंच्या अफाट सैन्याचा त्या हरिद्वेष्टयाने चक्काचूर उडविला. त्याचे हिंदु राज्य बुडविले. ते परत स्थापू निघालेल्या परमवीर शंकरदेवास जिते धरुन अंगाचे कातडे सोलून ठार मारले. संतमहंत घरोघर देवाशी हंसत, जेवत, बोलत असता महाराष्ट्र भगवंताची प्रत्यक्ष राजधानी झालेली असता तिकडे बिहार-बंगाल, अयोध्या-काशीत हिंदु राज्यश्री परकीयांच्या घोड्याच्या टापाखाली तुडविली जात होती. पण विंध्याद्रि उतरून प्रलय दक्षिणेवर कोसळणार हे स्पष्ट झाले होते एक टपालवाल्यालाहि जी सूचना देता आली असती की अलाउद्दिन चालून येत आहे ती मात्र ज्ञानेश्वरांना रेड्याच्या किंवा स्वतःच्या तोंडून देता आली नाही!! ज्ञानेश्वर निर्जीव भिंत चालवू शकले, पण सजीव माणसे मंत्रबळे चालवून विंध्याद्रिच्या खिंडीत अलाउद्दिनला रोखण्यासाठी उभी करु शकले नाहीत!! सन्‌ 1294त दक्षिणेच पहिला पाय टाकला आणि हिंदुराज्ये, देवदेवता उद्‌ध्वस्त करीत इतक्या दुर्धुष वेगाने पुढ़े घुसला की 1310च्या आत त्यानी रामेश्वरापर्यंतचे सारे राज्य निर्हिंदु करुन रामेश्वरला मशीद बांधली. इकडे विठूरायाची नगरी भगवंताच्या नामघोषाने दणाणतच होती, संताचे जाळे गांवोगांव पसरत होते, त्यांच्या घरात येऊन देव प्रत्यक्ष जोडे शिवीत होते, मडके घडीत होते दळणे दळीत होते. बादशहाची खंडणी भरीत होते. जपजाप्य, व्रतवैकल्य, नामसप्ताह इत्यादिंचा पर्वकाळ गजबजला होता. तिकडे एक सोडून पाच पादशाह्या हिंदुंच्या उरावर नाचत होत्या 'देवलदेवी" रावण पळवीत, बाटवीत होते. पण प्रत्येक देवास दोहोंपेक्षा जास्त हात असूनहि त्यांपैकी एकानेहि अलाउद्दिन किंवा मलिक अंबरचा हात धरला नाही. हिंदुंची हजारो तरुण मुले-मुली गुलाम होत असता, राजकन्या दासी होत असता, जोडे शिवीत बसलेल्या देवाला करुणा आली नाही की काशी ते रामेश्वरपर्यंत हजारो देवालय पाडून त्यांच्या मूर्तींची मशीदीची पायरी केली जात असता त्या देवाला या अत्याचारांचा राग आला नाही. पण एक नवस जरी चुकला तर त्या हिंदुचा कुलक्षय मात्र होई.

भगवंताचे अधिष्ठान होते त्या राज्याचा चक्काचूर कोणी उडविला तर त्या ज्यांस आम्ही पंचपातके म्हणतो ते करणाऱ्यांनी. जी गोष्ट या मुसलमानांची तीच पुर्तूगीजांची. तेथून मूठभर लोक येतात गोमांतकात घुसतात. हिंदुंवर धार्मिक छळाची आग पाखडतात. हजारो तरुण हिंदु मुले-मुलीं दास करुन यूरोप-आफ्रिकेच्या बाजारात विकतात. सारे हिंदु संस्कार दंडनीय ठरवतात. जीव घेऊन लोकच नव्हे तर देवहि आपआपल्या मूर्ती भंगू नयेत म्हणून श्रीमंगेश, शांतादुर्गा प्रभृति देवहि पळाले आणि तेहि आपल्या पायांनी नव्हे तर भक्तांच्या खांद्यांवर आपल्या पालख्या लादून.

भगवंताच्या अधिष्ठानाच्या अशाच वल्गना पीर-पाद्रयांनीहि हजारो वेळा केल्या होत्या. पण इतिहासानी त्याहि तशाच खोट्या पाडल्या. सावरकरांनी तो इतिहास पण विस्ताराने दिला आहे पण आम्ही तो विस्तारभयाने देत नाही आहोत.

सारांश सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, इतकेच काय ते खरे आहे. ऐहिक यश ज्या चळवळीस हवे तिने ऐहिक, भौतिक, प्रत्यक्ष सृष्टीत उपयोगी पडतील तेवढ़ी साधने संपादून विपक्षावर 'सामर्थ्यात" मात केली की ती चळवळ बहुधा यशस्वी होते. मग तिला ज्याच्या धार्मिक पोथ्यातील कल्पनां प्रमाणे न्यायाचा, पुण्याचा, स्नानसंध्याशील उपायांनी मिळविल्या जाणाऱ्या भगवतांच्या आध्यात्मिक अधिष्ठानाचा पाठिंबा असो वा नसो! हीच गोष्ट जगातील पारशी, ख्रिस्ती, मुसलमानी; यहूदी प्रभृति यच्चयावत धर्मग्रंथातील वचनांची नी त्यांच्या इतिहासाची आहे. शेवटी सावरकर म्हटतात, ऐहिक यश ज्यास हवे, त्याने अद्यावत वैज्ञानिक सामर्थ्य संपादावे. चळवळीत ते सामर्थ्य असेल तर भगवंताच्या अधिष्ठानावाचून कांही अडत नाही. ते सामर्थ्य नसेल तर भगवंतांच्या अधिष्ठानासाठी कोटी-कोटी जप केले तरी ऐहिक यश मिळत नाही, हाच सिद्धांत!

पण दुर्दैव हे की अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांहि हे सावरकर नको आहेत; पोथीनिष्ठ पुरोगाम्यांना त्यांचे हिंदुत्व तर नकोच आहे पण बुद्धिवादापुरते नाव सुद्धा घ्यावयास ते तयार नसतात. धर्मनिष्ठ अनुयायींना त्यांचा बुद्धिवाद नकोसा आहे. उरले सावरकर भक्त तर त्यांना त्यांचा केवळ जय जयकार करावयाचा आहे. केवळ मूठभर अनुयायीच असे आहेत जे त्यांना आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात.

No comments:

Post a Comment